डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त विद्या परिषदेचे सदस्य म्हणून आष्टीचे भूमिपुत्र डॉ.अरविंद रानडे यांची नियुक्ती
क्लिक2आष्टी अपडेट-आष्टीचे भूमिपुत्र तथा सध्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन,गांधीनगर गुजरात इथे संचालक पदावर कार्यरत असलेले डॉ.अरविंद रानडे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त विद्या परिषदेचे सदस्य म्हणून राज्याचे महामहीम राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
डॉ.अरविंद रानडे हे थोर शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या सानिध्यात राहून अभ्यासातून बहरलेले व्यक्तिमत्व आहे.सुरुवातीपासूनच गृह ताऱ्यांचा अभ्यास करत रानडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खगोल शास्त्रज्ञ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.मराठी,हिंदी,इंग्रजी या तीनही भाषेवर त्यांचे प्रभुत्व असून आष्टी सारख्या ग्रामीण भागातून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर आज देशाच्या कानाकोपऱ्यात विज्ञानाचा प्रचार,प्रसार व्हावा या उद्देशाने ते शालेय विद्यार्थ्यांना खगोल शास्त्राचे महत्व सांगून आकर्षित करत आहेत.जेणेकरून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात रुची आणि आवड निर्माण झाली पाहिजे तसेच मराठवाड्यातील लातूर विज्ञान केंद्राची प्रगती व्हावी यासाठी देखील डॉ.रानडे हे सातत्याने सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते.त्यांच्या या निवडीने आष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल देशभरातून डॉ अरविंद रानडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.