आंतरवलीच्या महासभेसाठी जिल्ह्यातून पाच लाख मराठा बांधव रवाना
जिल्ह्यातील सर्वच मार्ग झाले भगवामय
click2ashti update-मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शनिवारी (१४ ऑक्टोबर) लाखोंची सभा होत आहे.शुक्रवारी दुपारपासूनच मराठा बांधव वेगवेगळ्या जिल्ह्यांतून रेल्वे,बसने गावात दाखल होत होते.सोलापूर,पुणे,नांदेड,जळगाव अशा दूरवरील जिल्ह्यांतून अनेक जण रात्री उशिरापर्यंत दाखल होत होते.तर या सभेसाठी बीड जिल्ह्यातून सुमारे पाच लाख मराठा समाज बांधव सभेसाठी रवाना झाला आहे.प्रत्येक वाहन व लोकांच्या हाती भगवा झेंडा असल्याने राष्ट्रीय महामार्ग भगवामय झाला आहे.
मनोज जरांगे पाटील हे गोदाकाठच्या १२३ गावांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाची मागणी करीत आहेत.या मागणीवर वारंवार आंदोलने, उपोषणे केली आहेत.दरम्यान,आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता.पोलिसांनी गोळीबारही केला होता.यात अनेक उपोषणार्थीही जखमी झाले होते.यानंतर अनेक दिवस संपूर्ण राज्यात तणाव होता.यानंतर सरकारच्या काही प्रतिनिधींनी उपोषणस्थळी येऊन आरक्षणासाठी ३० दिवसांचा वेळ मागून जरांगे यांचे उपोषण सोडवले होते.अजून सरकारने आरक्षण जाहीर केले नाही.या पार्श्वभूमीवर १४ ऑक्टोबर रोजी विराट सभा घेतली जात आहे.या अनुषंगाने पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.
अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा
आधी पोवाडा, शौर्यगीते, मग जरांगेचा संवाद
सकाळी ९ वाजता-अरविंद घोगरे, सुरेश जाधव यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम
सकाळी ११ वाजता -राजेश सरकटे यांचा शौर्यगीतांचा कार्यक्रम.
दुपारी १२ वाजता-मनोज जरांगे पाटील यांचे आगमन व सुमारे एक तास भाषण.
मराठा आरक्षण क्यूरेटिव्ह पिटीशन कोर्टाने स्वीकारली
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणीस आपण तयार आहोत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले.या माध्यमातून सरकार मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहे.