राम खाडेच्या कथित हल्ल्याची सखोल चौकशी करा;आरोप सिध्द न झाल्यास खाडेवर गुन्हा दाखल करा-आ.सुरेश धस
आमदार सुरेश धस यांची जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे तक्रार
click2ashti update-येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांचे वर दि.९ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अशी तक्रार राम खाडे यांनी केली असून त्यामध्ये आ.सुरेश धस, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांचे विषयी तक्रार करण्यात आली आहे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आ.सुरेश धस यांनी राम खाडे यांचे वरील या हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे या घटनेची चौकशी होऊनच जाऊ द्या.मात्र ही तक्रार खोटी सिद्ध झाल्यास तथाकथित सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी तक्रार आ.सुरेश धस यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे दिलेल्या तक्रारी मध्ये आ.धस यांनी म्हटले की,राम खाडे यांनी आष्टी तालुक्यातील देवस्थान इनाम जमिनीच्या बाबत तक्रारी केल्या असून त्याबाबत गुन्हेही दाखल झाले आहेत.असे समजते या प्रकरणांशी आपला आणि कुटुंबीयांचा काहीही संबंध नसताना राम खाडे हे विरोधी पक्षातील असल्यामुळे त्यांच्या पक्षातील काही नेत्यांचे ऐकून विनाकारण आपली बदनामी करत आहेत.गेली ३० वर्षे आपण राजकारणात सक्रिय असून ३ वेळा विधानसभा आणि १ वेळ विधानपरिषद या निवडणुका जिंकलेल्या आहेत.अशा राजकारणी व्यक्तीला बदनाम करण्यासाठी राम खाडे हे सतत प्रयत्नशील असतात त्या मध्ये दि.९ ऑक्टोबर २०२३ रोजी माझ्या घरातून निघालेले एम एच-१६- ए बी ३६५ या महिंद्रा कंपनीच्या वाहन कोणाचे आहे?आणि खरोखरच त्यादिवशी हे वाहन माझ्या घरातून येऊन गेले आहे काय?
असल्यास या वाहनाचा मालक,चालक आणि वाहनामध्ये कोणी होते काय ? याची शास्त्रीय पद्धतीने चौकशी करण्यात यावी.तसेच सुपे या गावापर्यंत या वाहनातून पाठलाग करण्यात आला अशी कपोलकल्पित कहाणी राम खाडे यांनी रचली आहे.राम खाडे यांनी यापूर्वी अनेक व्यक्तींच्या माहिती अधिकारामध्ये माहिती मागवलेली असल्यामुळे त्यांना अनेक दुश्मन आहेत त्यामुळे बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना या प्रकरणी चौकशीचे तात्काळ आदेश द्यावेत आणि या कपोल कल्पित तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्यास शासनाची,पोलिस विभागाची दिशाभूल करून जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची बदनामी करणाऱ्या राम खाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.