व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मराठ्यांच्या अंदोलनाची धग पेटली;नेत्यांची फाटली…!

आष्टीत मराठा आरक्षण आंदोलकांचा गनिमी कावा गाफिल प्रशासन दिवसभर कुलूपबंद

0

click2ashti update-गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणावर “ब्र”शब्द न काढणारा आमदार,खासदार आज अंदोलनाची धग पेटल्यावर पोपटासारखे बोलत आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे जाहिर करतांना दिसत आहे.त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या अंदोलनाची धग पेटली..अन् राजकीय नेत्यांची फाटली असे एकंदरीत चिञ दिसून येत आहे.


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी कावा पद्धतीने अनेक लढाया लढल्या व त्या जिंकूनही दाखवल्या.अगदी त्याच पद्धतीने आष्टी तालुक्यातील मावळ्यांनी सोमवारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केलेल्या आंदोलनात पुरेपूर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या गनिमी काव्याचा उपयोग करीत आष्टी येथील अनेक शासकीय कार्यालयांना Government office
कुलूप ठोकत अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आत मध्ये कोंडून ठेवले.आंदोलकांनी दहा- दहा जणांचे ग्रुप करत आष्टी येथील सरकारी कार्यालयांना सकाळी दहा वाजता एकाच वेळी कुलुपे ठोकून शासनाचा तीव्र निषेध नोंदवला तर आष्टी येथील तहसीलदारांची शासकीय गाडी पहाटे अडीचच्या सुमारास अज्ञातांनी जाळली आहे.त्यामध्ये ही सरकारी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.संपूर्ण आष्टी तालुक्यामध्ये मराठ्यांचा रुद्रावतार पहावयास मिळत असून समाजातील तरुण मुले आता आरक्षणासाठी पेटून उठले आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते त्यावेळी राज्य शासनाने 30 दिवसाची मुदत मागितली होती त्याला जरांगे यांनी 40 दिवसाची मुदत देत ती मुदत दिनांक 24 ऑक्टोबर रोजी संपली त्यानंतर पुन्हा जरंगे पाटील Jarange Patil यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील कडा व आष्टी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे मात्र सोमवारी अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आष्टी तालुक्यात मराठ्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.


या कार्यालयाला लावले कुलूप
आष्टी तालुक्यामध्ये सोमवारी मराठा आंदोलकांनी गनिमी कावा पद्धतीने तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग ,पाटबंधारे विभाग ,खरेदी विक्री कार्यालय, वन विभाग,भूमी अभिलेख,तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये व आष्टी आगार या ठीक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गनिमी कावा पद्धतीने एकाच वेळी कुलपे ठोकण्यात आली.यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही आत मध्ये कोंडून ठेवण्यात आले.यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं…जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सरपंच व सदस्यांनी दिला राजीनामा
आष्टी तालुक्यातील 3000 लोकसंख्या असलेल्या अंभोरा गावातील जनतेतून निवडून आलेले सरपंच सागर सुभाष आमले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे तसेच यावेळी त्यांच्यासोबत असलेले नऊ ग्रामपंचायत सदस्य यांनीही श्री आमले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करून सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.


वकील,जैनश्रावक व पञकार सघांचा पाठिंबा
आष्टी तालुक्यातील आष्टी व कडा या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणास वकील संघ ,अखिल भारतीय सकल जैन समाज, आष्टी तालुका पत्रकार संघ इत्यादी सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
स्मशानभूमितच अंदोलन
आष्टी तालुक्यातील धानोरा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारची अंत्ययात्रा काढून संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेवण्यात आले. अंत्ययात्रा संपूर्ण गावातून फिरवून स्मशानभूमी मध्ये सरकारवर अंत्यसंस्कार करण्यात आले तसेच आजपासून याच स्मशानभूमीत मराठा समाजाचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत.
गुणवंत सदावर्तेचा पुतळा जाळला
आष्टी तालुक्यातील कडा येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाजाविषयी सतत गरळ ओकणारा व बेताल वक्तव्य करणारा गुणवंत सदावर्ते याचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी गुणवंत सदावर्ते मुर्दाबाद च्या घोषणाही देण्यात आल्या.
बॅनरवरील नेत्यांच्या फोटोला फासले काळे
कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग व नाफेड ने 60 रुपये किलो दराने भारत दाळ नावाने तूर डाळ विकण्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या बॅनर वरील भाजपचा राजकीय पुढार्‍यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. उद्घाटनापूर्वीच या बॅनर वर असलेल्या नेत्यांच्या तोंडाला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग बंद
सोमवारी सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास नगर बीड राष्ट्रीय महामार्गावर शेरी बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात टायर जाळून रस्ता बंद करण्यात आला होता जवळपास दोन तास राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
आगारात जाऊन बसवरील नेत्यांना फासले काळे
आष्टी तालुक्यामध्ये सोमवारी अचानक मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी आष्टी आगारांमध्ये घुसून एसटी बसेस वरील राजकीय नेत्यांच्या तोंडाला काळे फासले .आज संपूर्ण दिवसभर आष्टी आगारातून एकही बस सुटली नाही. या आगारांमध्ये जवळपास 55 ते 60 बसेस सकाळपासून उभा करण्यात आलेले आहेत तसेच आगाराला पोलिसांचा तगडा बंदोबस्त देण्यात आला आहे.
आमदार धस,माजी आ.धोंडे यांची अंदोलनकर्त्यांना भेट
दरम्यान सोमवारी आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे या ठिकाणी आमदार सुरेश धस यांनी भेट दिली व मराठवाड्यातील सर्व आमदारांना घेऊन उद्या मुंबई येथे एकत्र करून सरकारशी चर्चा करणार आहोत व समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी ही करणार आहोत .दरम्यान माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही आष्टी येथील सुरू असलेल्या उपोषणास भेट देत पाठिंबा दिला.

(बातमी स्ञोत गणेश दळवी,आष्टी)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.