दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर
100 दिवसांपासून संजय राऊत होते कोठडीत
मुंबई वृत्तसेवा-पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच,या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
गेल्या 100 दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे.
गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी व त्यानंतर दोनदा संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली होती. त्यामुळे आज राऊत यांना जामीन मिळण्याची शक्यता होती.त्यानुसार अखेर राऊत यांना जामीन मिळाला.
दरम्यान, संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडी आता उच्च न्यायालयात जाणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांना जामीन मिळाला असला तरी आज संध्याकाळपर्यंत न्यायालयाच्या निकालाची प्रत तुरुंग प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. त्यानंतर राऊत यांना तुरुंगाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होईल.
काय होतं प्रकरण..
————————
गोरेगावमध्ये गुरू आशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यावेळी प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार होता. संजय राऊतच या व्यवहाराचे मास्टरमाईंड होते, असा आरोप ईडीने संजय राऊत व प्रविण राऊत यांच्यावर केला आहे.
या अटींसह झाला जामीन मंजूर
———————————————
संजय राऊत यांना दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे दोन लाख रुपये भरण्यासाठी पीएमएलए कोर्टात हजर झाले आहेत. तसेच, कोर्टाने काही अटींवर संजय राऊतांना जामीन मंजूर केला आहे. चौकशीला बोलावले जाईल तेव्हा हजर रहावे, ही त्यातील प्रमुख अट आहे.