व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पोलिस माझं काहि वाकडं करू शकत नाहीत;आपला बाॅस सागर बंगल्यावर बसलाय

आमदार नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

0

click2ashti update-पोलिस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसलाय. तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राणे बोलत होते. नितेश राणे यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
वक्फ बोर्ड कायदा रद्द झाला पाहिजे, धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे, लव्ह जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे, माळशिरस तहसील कार्यालयातील इस्लामीकरण हटवलं पाहिजे या विषयावर आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत आज माळशिरस तहसील कार्यालयावर हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन माळशिरस येथील सकल हिंदू समाजाने आयोजित केले होते.
आमच्या सणांमध्ये अडथळे आणू नका
भाजप आमदार नितेश राणे या हिंदू मोर्चात म्हणाले की, आपण इतर धर्मीयांच्या सणांमध्ये अडथळे आणत नाही. आपल्या सणात इतरांचे अडथळे येऊ लागले आहेत. त्यांनी आता मर्यादेत राहावे असा इशारा राणे यांनी दिला. यापुढे माळशिरसमधून एकच फोन आला पाहिजे. नितेश साहेब कार्यक्रम केलाय आता वाचवा. झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमची असणार.
माझं काही वाकडं होणार नाही
राणे म्हणाले की, पोलिसांसमोर बोलतोय. माझं काही वाकडं होणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असे वक्तव्य त्यांनी केले. कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याच्या कानाखाली 12 वाजवल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असे चिथावणीखोर वक्तव्यही राणे यांनी केले.
चिथावणीखोर वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाची चिंता
राज्यासह देशभरात कट्ट्ररतावाद्यांकडून होत असलेल्या चिथावणीखोर वक्तव्यावर सुप्रीम कोर्टानेही नाराजी व्यक्त केली आहे. चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत. मात्र, त्यानंतर समाजात तेढ वाढवणारी वक्तव्ये होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
‘सागर’बंगल्याचा उल्लेख का?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान सागर बंगला आहे.नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आपल्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होऊ देणार नाहीत,आपल्या पाठिशी ते असल्याचे सूचक वक्तव्य म्हणून राणे यांच्या भाषणाकडे पाहिले जात आहे.त्यामुळे विरोधक देवेंद्र फडणवीस यांनाही घेरण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.