व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत,त्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण द्या”,सरकारने जर अंमलबजावणी नाही केली तर “पश्चाताप” शब्दाचा अर्थ कळेल-मनोज जरांगे

पञकार परिषदेत सरकारला जरांगे पाटील यांचा ईशारा

0

click2ashti update-सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास आगामी काळात भयंकर असे मराठा आंदोलन उभे राहील.हे आंदोलन पाहून सरकारला पश्चाताप या शब्दाचा अर्थ काय असतो,याची प्रचिती येईल,असा थेट इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.मराठा आरक्षणासाठी आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे.त्यापूर्वी सकाळीच मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
पुढेबोलतांना जरांगे म्हणाले, “सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळाले नाही तर विधिमंडळात पारित होऊ घातलेल्या मराठा आरक्षण विधेयकाचा बहुतांश समाजाला कोणताही फायदा नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मराठा समाज झुंजत आहे.राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. पण या कायद्यातंर्गत मिळालेल्या स्वतंत्र आरक्षणाचा फायदा केवळ 150 ते 200 मराठ्यांनाच मिळणार आहे”,असे ते म्हणाले.
सरकारचे प्रतिनिधी आप-आपल्या सोयीने माझ्याकडे येतात
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली. गेल्या कित्येक दिवसांत राज्य सरकारचे शिष्टमंडळ किंवा प्रतिनिधी आपल्याशी चर्चा करायला आले नाही असे म्हणत जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार येतो.त्यांच्या सांगण्यानुसार वागलो तर आपण चांगले ठरतो.त्या लोकांना कामं असतात,ती मोठी लोकं आहेत,त्यांच्या विमानाचा खर्च वाया जातो.ते विमानातील डिझेलसाठी गरिबांचा पैसा उडवतात. पण त्यांच्याकडे सामान्य मराठ्यांचा आक्रोश,किंकाळ्या बघायला वेळ नाही”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
आज सरकारचे विशेष अधिवेशन होणार
दरम्यान, राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडत आहे.या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाईल. काही दिवसांपूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला होता.त्यामुळे मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी राज्य सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष आहे.
स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण नुकसान करणारे
जरांगे म्हणाले, “दोन-तीन लोकांना मराठा समाजाचं वाट्टोळं करायचं आहे. यापूर्वी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले. तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या, पण नियुक्त्या झाल्या नाहीत. या पोरांच्या हातात आता पेन हवा होता, पण आज या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे. त्यांचं वय निघून जात आहे. आताही मराठा आरक्षण टिकलं नाही तर तेच होणार.त्यापेक्षा आम्हाला ओबीसीत असणारं आमचं आरक्षण द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण द्या”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण मराठा समाजाचे नुकसान करणारे आहे. तुम्हाला दोन-तीन लोक महत्त्वाचे आहेत की 6 करोड मराठा महत्त्वाचे आहेत, असा सवाल जरांगे-पाटील यांनी विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.