BREAKING NEWS-पंकजा मुंडे यांची गाडी मराठा अंदोलकांनी अडवली;काळे झेंडे दाखवत दिल्या घोषणा
बीड लोकसभा मतदार संघातील केज तालुक्यात प्रचारासाठी जात असतांना घडला प्रकार
click2ashti update-बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे या प्रचारासाठी जात असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली.या दरम्यान पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवत,एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली.अखेर पोलिसांना सोम्य बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवावे लागले.मात्र,आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलक नसून विरोधी राजकीय पक्षांचे लोक असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर केला आहे.याबाबत आपण पोलिसांकडून माहिती घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक या लोकसभा मतदारसंघात त्यांच्या भगिनी डॉ.प्रीतम मुंडे या खासदार होत्या.मात्र, प्रीतम मुंडे यांना डावलात पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली. पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले असल्याची चर्चा आहे.मात्र,बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.त्याचाच काहीचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील येत आहे.
नेमके घडले काय?
तुकाराम बीज निमित्त बीड लोकसभा मतदारसंघातील केज तालुक्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दरवर्षी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे भेट देत असतात. याच कार्यक्रमासाठी जात असताना मराठा आंदोलकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत पंकजा मुंडे यांची गाडी अडवण्यात आली. त्यामुळे पंकजा मुंडे यांना कार्यक्रमाला जाता आले नाही.मात्र,हे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते नसून विरोधी पक्षाचे लोक असतील अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मी जातीचे राजकारण करत नाही
या संदर्भात बोलताना पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला आहे.एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करत मला काळे रुमाल दाखवले ते मनोज जरंगे पाटील यांचे कार्यकर्ते नसून विरोधी राजकीय पक्षाचे लोक असण्याची शक्यता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर मी कोणत्याही जातीचे राजकारण करत नाही.निवडणुकीच्या वेळी माझी जात विचारली जाते,हे दुर्दैव असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.