शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जाहिर होण्याची शक्यता;बीडमधून कुणाला संधी मिळणार?
बीड,रावेर,सातारा,माढा आणि भिंवडी या जागेंचा समावेश
click2ashti update-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.या यादीमध्ये बीड,रावेर,सातारा,माढा आणि भिवंडी या जागांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.याबाबत चर्चा सुरू आहे.उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष तसेच काँग्रेस मधील नेत्यांमध्ये काही जागांवरून अद्याप वाद सुरू आहे.असे असताना शरद पवार यांचा गट दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.सातारा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.त्यामुळे आता साताऱ्या मधून शरद पवार कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.मात्र,पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.त्यामुळे साताऱ्याची जागा ही शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडतो का? याकडे सर्वात लक्ष लागले आहे.
बीडमधून उमेदवारीसाठी ज्योती मेटेंना,पवारांच्या निर्णयाची प्रतीक्षा
शिवसंग्रामच्या नेत्या डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता मुंबईत खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली.यात बीड लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा केली.लोकसभा लढवण्याबाबत शरद पवार निर्णय घेणार असून त्यांच्या निर्णयाची मला प्रतीक्षा असल्याचे डॉ.ज्योती मेटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.डॉ.ज्योती मेटे यांनी शासकीय नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेतली असून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी त्यांनी मुंबईत जाऊन खासदार शरद पवार यांची भेट घेत राजकारणातील प्रवेशासंदर्भात चर्चा करत पक्षाची भूमिका मांडली.माझ्या बीडमधील उमेदवारीसंदर्भात अंतिम निर्णय लवकरच होणार असल्याचे डॉ.ज्योती मेटे यांनी सांगितले.पवार यांच्याकडून निर्णय आल्यावरच पुढची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल यापेक्षा माझ्या राजकारणात सक्रिय होण्याबाबत आज चर्चा झाली आहे.ही चर्चा जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बुधवारी काही प्रवेश होणार होते.आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का,असा प्रश्न माध्यमांनी विचारताच आज
माझा प्रवेश नव्हता,असे त्या म्हणाल्या.