खरे मजूर बांधकामावरच,बोगस मजुर बनले शासनाचे लाभार्थी !
आष्टीत बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी योजनेवर धनदांडग्यांचा डल्ला
click2ashti update-राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीसाठी पात्र बांधकाम कामगारांना विविध ३२ योजनांद्वारे लाभ देण्यात येत आहे. आष्टी तालुक्यात मात्र खरे मजुर बांधकामावरच असून या योजनेचा फायदा घेण्यासाठी धनदांडगे सरसावले आहेत.बनावट कागदपत्रांआधारे नोंदणी करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस लाभार्थी तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात सुरू आहे.
राज्य शासनासह केंद्र शासनाकडून बांधकाम कामगार व रोजंदारीवर काम करणा-या मजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना अमलात आणल्या जात आहेत.या योजनांचा लाभ गोरगरीब बांधकाम,कामगार,शेतमजूरापर्यंत पोहोचणे ऐवजी या योजनांचा लाभ बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिकदृष्ट्या धनदांडगे लोकच फायदा घेऊ लागले असून या गंभीर प्रकरणात अधिकारी-कर्मचारी देखील आपले हात ओले करून घेत असल्याचे चित्र आष्टी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.आष्टी तालुक्यातील प्रत्येक गावास बोगस कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून देण्यासाठी दलाल सक्रिया झाले असून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत ग्रामसेवकाकडून नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घेऊन बोगस कामगारांची सर्रास नोंदणी सुरू आहे. ग्रामसेवकांनी शिक्के न दिल्यास दलालांमार्फत दबावतंत्राचा वापर करण्यात येत असून काहींनी तर ग्रामसेवकांच्या बोगस शिक्यासह स्वाक्षरींचा वापर करून जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय बीड येथे शेकडो बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदणी केल्याचे बोलले जात आहे. या सर्व बाबींची पडताळणी करून प्रशासनाने बोगस मजुरांना वगळावे व ख-या गरजू मजुरांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
खरे लाभार्थी सैरभैर;खोट्यांचीच चलती...
दरम्यान बोगस कामगार नोंदणीमध्ये जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांचा देखील सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.दलालांना हाताशी धरून व अर्थव्यवहार करून नोंदणीकृत बोगस लाभार्थींना लाभ मिळवून देण्यात येत आहे. दुसरीकडे नोंदणी केलेल्या ख-या मजुरांचे प्रस्ताव मंजुर होत नसल्याने ते सैरभैर झाले आहेत.तालुक्यातील अनेक गावांत कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांच्या परस्पर वस्तू वाटपासाठीचे कॅम्प आयोजित करून नोंदणी झालेल्या कामगारांची लूट केली जात आहे.
शिक्षणासाठीच्या मदतीसाठी बोगस कामगार नोंदणीकडे ओढा
कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रतिवर्षी पहिली ते सातवी २ हजार ५०० रुपये आठवी ते दहावी १० हजार रुपये, ११वी व १२वीच्या शिक्षणासाठी १० हजार रुपये, पदवीच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये,वैद्यकीय पदवीसाठी एक लाख, अभियांत्रिकीसाठी ६० हजार,पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २० हजार,पदव्युत्तर शिक्षणासाठी २५ हजार रुपये मानधन व एमएससीआयटी पास झालेल्या कामगारांच्या मुलांना फीचा परतावा देण्यात येणार आहे. शिक्षणासाठीच्या या योजनेमार्फत देण्यात येणा-या लाभासाठी अर्ज भरण्यासाठी बोगस लाभार्थींची झुंबड उडाल्याची चर्चा आहे.