मत्स्येंद्रनाथांच्या प्रकट दिन उत्सवास लाखो भाविकांची गर्दी
click2ashti update-नाथ संप्रदायाचे आद्यनाथ म्हणून चैतन्य मत्स्येंद्रनाथांची ओळख ऋषिपंचमीला त्यांचा प्रकट दिन उत्सव देशभर साजरा केला जातो.मत्स्येंद्रनाथांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र मायंबा येथे देशातील लाखो नाथभक्त व साधकांनी उपस्थित राहून गुरुस्थान म्हणून पारंपरिक पद्धतीने साधना केली.लाखों भाविकांनी सायंकाळी उशिरापर्यंत नाथांचा जयजयकार करीत दर्शन घेतले.

आष्टी तालुक्यातील सावरगांव (मायंबा) येथे रविवार (दि.८) सकाळी नाथ संप्रदायाची उपासक अशोक मरकड महाराज,देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे,सचिव बाबासाहेब म्हस्के आर्दीच्या हस्ते नाथांच्या समाधीची महापूजा होऊन नाथांचे वाहन असलेल्या पांढऱ्या शुभ अश्वासह प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.फटाक्यांची आतषबाजी,ढोलताशा व झांजेचा गजर,नाथांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. मच्छिंद्रनाथांच्या समाधीसह वृद्धेश्वराचे दर्शन घेऊन पूजाविधी केल्यास गिरणार पर्वताला प्रदक्षिणा घालून दर्शन घेतल्याचे फल मिळेल,असा उल्लेख दत्त संप्रदायाच्या विविध धर्मग्रंथांमध्ये आहे.मच्छिंद्रनाथांना दत्त उपासक अवधूत अवतार म्हणजे एकमुखी दत्ताचा अंशात्मक अवतारही मानतात.तसा उल्लेख मायंबा येथील मुख्य आरतीमध्ये आहे. ऋषिपंचमीला अनेक भाविकांकडून भंडारा महाप्रसादाचे आयोजन केले जाते.देवस्थान समितीतर्फे उपस्थित भाविकांना महाप्रसाद दिला जातो.गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये नाथ संप्रदायाची स्थापना झाल्याने संपूर्ण गर्भगिरी डोंगररांगा उपासकांच्या दृष्टीने पवित्र समजल्या जातात.अनेक वाचासिद्ध व सिद्धी प्राप्त साधक या दिवशी मायंबाला येऊन मच्छिंद्रनाथांचे पूजन करीत उपासनेची शक्ती प्रसाद स्वरूपात प्राप्त करतात.सर्व नाथ भूमी ही सिद्ध भूमी असल्याने मनुष्य रूपात सिद्धांचा येथे सतत वावर असल्याची उपासकांची श्रद्धा आहे. महापूजेनंतर नवनाथ ग्रंथातील मच्छिंद्रनाथांच्या प्रकट दिनाच्या अध्यायाचे वाचन,जन्माचा पाळणा व त्यानंतर मिरवणूक झाली.
समाधानकारक पावसामुळे गर्भगिरी डोंगर परिसर अत्यंत रमणीय
आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान समितीतर्फे वर्षभर विविध उत्सवांचे आयोजन केले जाते.सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी साधकांची नेहमी वर्दळ असते.सध्या समाधानकारक पावसामुळे गर्भगिरी डोंगर रांगा,मायंबा,मढी,वृद्धेश्वराचा परिसर अत्यंत रमणीय व हिरवाईने नटला आहे.निरव शांतता व पाण्याच्या प्रवाहांच्या आवाजातही ईश्वरी अंश असल्याची अनुभूती भाविकांना येते.धार्मिक व निसर्ग पर्यटनासाठी मढी वृद्धेश्वर मायंबा परिसर अत्यंत अनुकूल बनला आहे.