काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी
मुंबई । प्रतिनिधी-काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी करुन प्रदेशध्यक्षपदी तरुण चेहऱ्याचा संधी देण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले अपयश आिण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये काही फेरबदल होण्याचे संकेत हायकमांडने दिले होते. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवीन प्रदेशध्यक्ष देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आज काँग्रेसचे एकनिष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशध्यक्षपदाची माळ पडली. गांधी परिवाराचे अत्यंत जवळचे सहकारी ते मानले जातात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. यासह पंजाबसह, गुजरात, मध्य प्रदेशमध्येही सहप्रभारी म्हणून सपकाळ यांनी काम पाहिले आहे.