व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विचार बचतीचा:गब्बर संचालक,मिंदे अधिकारी,हताश ठेवीदार,अन् डबघाईस आलेल्या पतसंस्था;ठेवीदारांनी विचार करण्याची गरज

गब्बर पतसंस्था संचालक:मिंदे अधिकारी भाग-१

0

आष्टी गणेश दळवी-आयुष्‍यभर पोटाला चिमटा देऊन पै-पै जमा केलेला पैसा आयुष्याच्या संध्याकाळी कामात येईल…मुलींच्या लग्नाची चिंता दूर होईल…मुलांचं शिक्षण पूर्ण करता येईल,असे स्वप्न पाहणार्‍या तालुक्यातील शेकडो पतसंस्था ठेवीदारांच्या नशिबी निराशा आलीये.पैशांअभावी उपचार करता येत नसलेले काही वयोवृद्ध ठेवीदार मृत्युशी झुंज देताहेत तर आपल्या मेहनतीची कमाई वेळेत मिळत नसल्याने काहींच्या मनावर परिणाम झाला आहे.पतसंस्था चालकांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि त्यात कर्जाची वसुली होत नसल्याचे कारण दाखवून ठेवीदारांची अडवणूक केली जाते.राज्यातील बहुतेक पतसंस्था या राजकीय नेत्यांच्या असल्याने सरकार आणि राजकीय मंडळींकडून होणारे दुर्लक्ष आणि विशेष म्हणजे पतसंस्थांवर नियत्रंण ठेवणारी सरकारी यंत्रणाच मिंदी होऊन,पतसंस्थेत होणा-या घोळाकडे लक्ष देण्याऐवजी किंवा तक्रार दाराने सहाय्यक निबंधक यांच्याकडे माहिती मागितली तर पतसंस्थेच्या चुकांवर पांघरूण घातल्याने या गब्बर संचालकांना पाठिशी घालण्याचे नुकतेच समोर आले आहे.या सरकारी यंत्रणेमुळे आपल्याच घामाच्या पैशांसाठी ठेवीदारांवर आता दरोदार भटकण्याची वेळ येत आहे.

सहकार चळवळीला भ्रष्‍टाचाराची कीड…
महाराष्ट्रात सहकारी चळवळ चालू होऊन शंभरपेक्षाही जास्त वर्षे झालीत.त्यातून साखर कारखाने, सूत गिरण्या, कृषीमाल प्रक्रिया उद्योग,महिला उद्योग,बँका,पतसंस्था, विकास सोसायट्या इत्यादी संस्थांनी जन्म घेतला.विशेष म्हणजे कमी कालावधीत चांगल्या पद्धतीने आर्थिक अभिसरण होऊन ते समाजाच्या तळागाळापर्यंत रुजविणारे जाळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहचले.या नेटवर्कमधून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची विधायक दिशा आणि वेगही सुरुवातीच्या काही दशकांमध्ये स्पष्टपणे जाणवला.पण अलीकडच्या काळात समाजहिताचा उद्देश असलेल्या सहकारी चळवळीला स्वार्थाची,भ्रष्टाचाराची, राजकारणाची आणि राजकारण्यांची कीड लागली.बघता बघता याच सहकारी क्षेत्रांमुळे महाराष्‍ट्रातील राजकारण, समाजकारण,त्यातील उच्च समाजमूल्ये पायाभूत मानून उभ्या राहिलेल्या संस्थांचे अर्थकारण,सारेच उद्ध्वस्त होतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठेवीदारांची एकच चूक…
बीड जिल्ह्यात शेकडो पतसंस्था,मल्टीस्टेट
संपुर्ण बीड जिल्ह्यात शेकडो मल्टीस्टेट,पतसंस्था असून यामध्ये ज्ञानराधा,शुभकल्याण,जिजाऊ माॅ साहेब,परिवर्तन,
बीएचआर, राजस्थानी मल्टीस्टेट यासह राज्यातील मल्टीस्टेट,पतसंस्था अडचणीत सापडल्या असल्याची माहिती सहकार विभागात आहे.परंतु,प्रत्यक्षात राज्यातील दोन हजार पतसंस्था अडचणीत सापडल्या आहेत.त्यात सामान्य माणसांचे, शेतकर्‍यांचे, छोट्या-मोठ्या उद्योजकांचे कोट्यवधी रुपये अडकून बसले आहेत.या ठेवीदारांची चूक एवढीच होती की,त्यांनी ‘सहकार चळवळी’तल्या नीतिमूल्यांवर विश्वास ठेवला आणि काही ठिकाणी स्पष्ट दिसत असलेल्या अपप्रवृत्तींकडे डोळेझाक केली. 2007 अखेर राज्यातील जवळजवळ सगळ्याच पतसंस्थांमार्फत वारेमाप कर्जवाटप झाले.परंतु,कर्ज वसुलीचे कोणत्याही‍ प्रकारचे नियोजन नसल्याने वसुल झाले तेवढे झाले.मात्र बाकीचे वसुल होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.त्यामुळे ज्या ठेवीदारांनी ठेवीची रक्कम परत मागितली,ती मिळणे त्यांचा हक्क असतानाही त्यांना ती मिळू शकलेली नाही. परिणामी संस्था बुडाल्याच, पण ठेवीदारांनाही वार्‍यावर सोडण्यात आले.
ठेवीदारांना आधार अण्णांचाच…
जिल्ह्यातील मल्टीस्टेट मध्ये गुंतवणुक केलेले बहुतेक ठेवीदार हे वयस्कर आहेत.आपल्या पैशांसाठी पाठपुरावा करताना त्यांचा जोश कमी कमी होत आहे.त्यांच्यात नैराश्‍य आल्याचे दिसते आहे.एक ना अनेक समस्यांनी ठेवीदार अक्षरश: पिचले आहेत.आपल्याला आपला मेहनतीचा पैसा मिळेल,अशी आशाच काही ठेवीदारांनी सोडून दिली आहे. काही ठेवीदार तर संघटनांच्या सभांनाही येत नाहीत. त्यामुळे राज्यातील ठेवीदारांचा प्रश्न विधानसभेत आष्टी चे आमदार सुरेश धस आण्णा यांनी मांडत.याकडे सरकारने लक्ष देण्याची विनंती अधिवेशनात केल्याने हताश झालेल्या ठेवीदारांना नवी ऊर्जा निर्माण करण्याचा मानसही काही ठेवीदारांनी व्यक्त केला आहे.
(क्रमशः)
आष्टीतील 25 वर्षाच्या पतसंस्था डबघाईला;वाचा उद्याचा भागात

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.