आष्टीत व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे धरणे आंदोलन;पत्रकारांच्या विविध मागण्यांचे दिले निवेदन
क्लिक2आष्टी अपडेट-पत्रकारिता आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी (दि.११) व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पत्रकारांनी सहभाग नोंदविला. माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. या अनुषंगाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने गुरुवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.याला प्रतिसाद देत आष्टी तालुका शाखेतर्फे गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर पत्रकारांनी धरणे आंदोलन केले.
पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण‘क’वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे.लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात या प्रमुख मागण्यांकडे निवेदन नायब तहसीलदार बाळदत्त मोरे यांना देण्यात आले.या आंदोलनात डीजिटल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष अविशांत कुमकर,तालुकाध्यक्ष अनिरुद्ध धर्माधिकारी,कार्याध्यक्ष भाऊसाहेब गाडे,उपाध्यक्ष यशवंत हंबर्डे,नितीन कांबळे,संघटक मुजाहिद सय्यद,रहेमान सय्यद,कृष्णा पोकळे,विकास म्हस्के,गोपाल वर्मा आदी सहभागी झाले होते.आष्टी तालुका पत्रकार संघ,आष्टी प्रेस क्लब,पुरोगामी पत्रकार संघ,आष्टी तालुका ग्रामीण पत्रकार संघानेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.