व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धक्कादायक;बीड जिल्ह्यात मे महिन्यांच्या २५ दिवसांत थांबविले ३३ बालविवाह

स्पेशल रिपोर्ट-गणेश दळवी आष्टी

0

क्लिक2आष्टी अपडेट-बीड जिल्ह्यात सध्या एकच चर्चा आहे ती बालविवाहांची. मे महिन्याच्या २५ दिवसांत ३३ बालविवाह थांबवण्यात आले.अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात बालविवाह सर्वात जास्त होणारा बीड जिल्हा हा दुसरा क्रमांकाचा जिल्हा असल्याचेही समोर आले आहे.
बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याने ज्या अल्पवयीन मुलींचे लग्न होणार होते.त्या मुली,तिचे आईवडील व काही वऱ्हाडींना जिल्हा बालकल्याण समितीच्या कार्यालयात हजर करण्यात आले.’साहेब, आता पट्टा पडल्याने (कारखान्यांचा गळीत हंगाम संपला) गावाकडं आलोय.पुन्हा ६ महिने ऊसतोडणीसाठी घराबाहेर पडावं लागेल.एका मुलीची आई म्हणाली,मुलीचे लग्न नव्हे, तर वास्तुशांतीचा कार्यक्रम होता.’ दुसऱ्या मुलीचा बाप सांगत होता, ‘साखरपुडा करून घेत होतो.मुलगी १८ वर्षांची झाल्यावर लग्न करणार होतो.’ एका मुलीची आई म्हणत होती, ‘इचा बाप आम्हाला सोडून गेला.मी दिवसभर मजुरीला जाते.घरी कुणीबी नसतं.मुलीचं १८ वर्षे वय झाल्यानंतर लग्न करून मोकळे होणार होतो तोच दारात पोलिस उभे राहिले…’असे प्रत्येक मायबाप काही ना काही कारण सांगत होते.प्रत्येकालाच आपल्या मुलीचे लग्न करून आपल्या जबाबदारीतून मोकळं व्हायचंय. पण आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून अल्पवयीन मुलीचं लग्न करत होतो हे मान्य करत नव्हते.मात्र त्यांचे चेहरे खरं काय आहे ते सांगत होते.
ही फक्त या चार पालकांची कथा व्यथा नव्हे,तर संपूर्ण बीड जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे.बीड हाऊस कामगारांचा जिल्हा.वर्षाच्या ३६५ पैकी जवळजवळ २०० दिवस ऊसतोडीसाठी कोयता (पती-पत्नी) घराबाहेर असतात.घरी फक्त वृद्ध आईवडील असतात.त्यांच्या भरवशावर मुलीला घरी सोडून जाणे त्यांना सुरक्षित वाटत नाही म्हणून मुलगी १२-१४ वर्षांची झाली की लग्न करून मोकळे होतात.
बालविवाहात बीड जिल्हा राज्यात दुसरा
पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यात सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या १० जिल्ह्यांत मराठवाड्यातील आठ जिल्हे आहेत.त्यात बीड दुसऱ्या क्रमांकावर आहे.बालविवाहांमुळे कमी वयातच मुलींवर मातृत्व लादले जात आहे. १५ ते १९ वर्षे वयाच्या १५ टक्के मुली गर्भवती असल्याचाही राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल सांगतो.या अहवालापेक्षाही जिल्ह्यात भयानक स्थिती आहे.ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी निवासी हंगामी वसतिगृहांची व्यवस्था,जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी, गावातच मुलींच्या सातवीनंतरच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास बालविवाहांचे प्रमाण काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते, असा विश्वास या क्षेत्रात काम करणाऱ्या आहे. जिल्हा प्रशासन बालविवाह रोखण्यासाठी तत्पर आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या गावात रोखला बालविवाह
कन्हेरवाडी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे हे गाव.२९ मे रोजी एक बालविवाह होणार होता.मात्र तो रोखला. मुलीची आई म्हणाली, ‘नवरा सोडून गेला.मोलमजुरी करून मुलाबाळांचे पोट भरते.मुलीचे वय १६ वर्षे ११ महिने.घरी कुणी नसतं. काय करणार? मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करून जबाबदारीतून मोकळं होणार होतो.तत्पूर्वीचे दाराशी पोलिस उभे राहिले.’असल्याचे मुलीच्या आईने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.