धक्कादायक;-“श्री”विसर्जन मिरवणूकीतील लेझर लाईटने तरूणांना गमवावे लागले कायमचे डोळे
click2ashti Update-गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, केवळ आवाजामुळेच नव्हे तर लेझर लाइटच्या झगमगाटामुळे तब्बल सहा जणांना आपली दृष्टी गमवावी लागल्याचेही समोर आले आहे. लेझरच्या लाइटमुळे डोळ्यांवरच थेट परिणाम होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे- लेझर लाइटमुळे सहा जणांवर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे. हे सहाही तरुण नाशिकचे आहेत. मात्र, धुळे, मुंबई आणि ठाण्यातही असे रुग्ण आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नाशिकमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे लावण्यास मनाई आहे. मात्र, यंदा आठ वर्षानंतर नाशिकमध्ये डीजे लावण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे या मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटावर तरुण बेभान नाचले. या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. हे लेझर लाईट थेट डोळ्यांवर गेल्याने सहा तरुणांवर आपली दृष्टी गमवावी लागल्याचे समोर आले आहे. हे सर्व तरुण विशी-पंचवीशीतील असल्याचेही सांगण्यात आले आहे.
लेझर लाइटमुळे डोळे भाजले
मिळालेल्या माहितीनुसार, लेझर लाइटच्या थेट संपर्कात आल्याने आधी या मुलांना अंधूक दिसू लागले. त्यानंतर त्यांचे डोळे चुरचुरू लागले. डोळे चोळल्यामुळे त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नेत्ररोग तज्ज्ञांनी त्यांना तपासले असता काहींच्या डोळ्यांमध्ये काळे डाग निर्माण झाल्याचे दिसले. तर, काही तरुणांच्या डोळ्यांवर भाजल्यासारख्या जखमा आढळून आले. अद्याप या तरुणांची नावे समजू शकली नाहीत.
कायम स्वरुपी डोळे गमवावे लागणार
दरम्यान, डॉक्टरांनी या तरुणांना तपासल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना अशा गंभीर इजा का झाल्या, हे डॉक्टरांनाही कळले नाही. काळा चष्मा न घालता वेल्डिंगचे काम जवळून पाहिल्यानंतर साधारण असे त्रास तरुणांना होतात. मात्र, जखमी तरुणांपैकी सर्वांनीच आपण वेल्डिंगचे काम पाहिले नसल्याचे सांगितले. नंतर या तरुणांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझर लाइटचा त्रास झाल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या तरुणांना आता कायमस्वरुपी आपली डोळा गमवावा लागण्याची भीती आहे. त्यामुळे रात्रीच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाइटचा वापर जपून करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.