खाबूगिरीची मर्यादाच ओलांडली;अभियंत्याने घेतली एक कोटीची लाच
click2ashti update-जुन्या कामांची बिले मंजूर करुन देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहमदनगरमधील सहायक अभियंत्याने ठेकेदाराकडून तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेतल्याची बाब समोर आली आहे. एक सहायक अभियंता कोटींची लाच स्वीकारत असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक महामंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे भ्रष्टाचाराची पातळी कुठपर्यंत पोहोचली आहे, हे समोर येत आहे.नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने नगर शहराजवळ सापळा रचून एमआयडीसी, अहमदनगर उपविभागाच्या सहायक अभियंता याला तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अमित किशोर गायकवाड (वय 32) असे या सहायक अभियंत्याचे नाव आहे. त्याने लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्यासाठी स्वीकारली असल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामंडळात खळबळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती.रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे.
मागील कामांच्या बिलासाठी लाच
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे म्हणून ते पाठपुरावा करत होते. मात्र, या बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्याकडून मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवून हे देयक पाठवण्याच्या मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्यासाठी ही लाच मागितली.या बिलाच्या कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले होते. तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
नाशिक पथकाने शुक्रवारी दुपारी नगर-संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या बाजूला सापळा लावला.त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्वीकारली.त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिस्स्याची 50 टक्के कोठे पोहोचवावी याबाबत विचारले.त्यावर वाघ याने सांगीतले की,’राहु दे तुझ्याकडे बोलतो मी तुला.ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सांगतो नंतर. सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवून दे’,असे म्हणुन वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले आहे.