अंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले,पोलिसांचे दुर्लक्ष..
एसपी साहेब जिल्ह्याच्या सरहद्दीवर लक्ष देतील काय ?
click2ashti update-बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांना ऊत आला असून या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत मात्र सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन उतरलेले पोलीस खाते मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असुन विनापरवाना दारू,वाळू,मटका,जुगार गुटखा आदी अवैध धंदे बंद करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
विनापरवाना दारू विक्री मटका,जुगार,ताडी,वाळू,चोऱ्या,दरोडे आदी अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस खाते का दुर्लक्ष करते हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.अगदी अंभोरा हद्दीत अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे असून याठिकाणी ही पोलीस कारवाई करण्याचे धाडस करीत नाहीत.त्यामुळे अनेक जणांचे संसार धुळीत मिळाले आहेत.तसेच गावठी दारू ही अनेक ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे.बीड येथील पोलीसानी येऊन अनेक कारवाया केल्या आहेत मात्र अंभोरा पोलिसांना त्या का दिसत नाहीत?असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.देवीनिमगाव,धामणगाव, सीना पट्टा,घोंगडेवाडी,वाघळूज आदी ठिकाणी नदी पात्रात वाळुचा राजरोसपणे उपसा होत असून,महसूल प्रशासन वाळू माफियांवर कारवाई करते मग पोलीस खाते गप्प का बसते ? याचा अर्थ सर्वसामान्य लोकांना समजून जात आहे.अवैध वाळू उपसा मुळे अनेक ठिकाणी नदीपात्राचा ऱ्हास होत गेला असून पर्यावरणाला त्यापासून धोका निर्माण झाला आहे.