कपिलधारला महाराष्ट्राची पंढरी करणार : खा. अजित गोपछडे
बीड click2news-श्रीक्षेत्र कपिलधार हे वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान आहे. माझ्या खासदारकीच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात कपिलधारचा विकास करुन या तीर्थक्षेत्राला राज्याची पंढारी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे वचन राज्यसभा सदस्य डॉ.अजित गोपछडे यांनी दिले. कपिलधार ही पवित्र भूमी आहे. या ठिकाणी राजकारण येऊ देऊ नका. कपिलधारचे पावित्र्य जपावे. कपिलधार येथे आल्यानंतर कधीही राजकीय भाषण करणार नाही असे सांगून लिंगायत समाजाला ५७ पोटजातीमध्ये सरसकट ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी कटीबध्द आहे असे खासदार गोपछडे यांनी म्हटले आहे.
हिंदू वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेनिमित्त पेठ बीडमधील माजलगावकर मठात वीरशैव लिंगायत समाज बीड जिल्हाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.खासदार डॉ.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हिंदू वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा काढण्यात आली.बुधवारी (दि.25) दुपारी १ वाजता खा.गोपछडे यांच्या हस्ते श्रीक्षेत्र कपिलधार येथे संतशिरोमणी मन्मथस्वामींच्या संजिवन समाधीस महाआरती केल्यानंतर दुपारी २ वाजता बीड शहरात यात्रेचे आगमन झाले.यावेळी बार्शी नाका ते माजलगावकर मठ दुचाकी रॅली काढण्यात आली.माजलगावकर मठात आयोजित कार्यक्रमास वीरुपाक्ष शिवाचार्या महाराज बेलापूरकर मन्मथधाम संस्थान,नितीन शेटे,अमरनाथ खुर्पे,शिवाअप्पा भुरे आदी उपस्थित होते