मी भाजप चे काम करणार नाही;अपक्ष निवडणूक लढविणार- माजी आ.भीमराव धोंडे
अपक्ष निवडणूक लढवून विजय निश्चित असल्याचा विश्वास केला व्यक्त
आष्टी click2ashti- मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी पराभूत झालो असलो तरी मला एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती.आणि त्याचवेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी सांगितले होते की, तुमचे काम चालू ठेवा पुढच्या वेळी तुम्हाला उमेदवारी दिली जाईल.परंतु मला उमेदवारी दिलेली नाही.हि उमेदवारी मागच्या वेळी ज्यांच्यामुळे आपला पराभव झाला होता त्यांना मिळाली.पण मी भाजप उमेदवार सुरेश धस यांचे काम करणार नाही,अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाने काल तिसरी उमेदवार यादी जाहिर केल्यानंतर यामध्ये आष्टी विधानसभेची उमेदवारी माजीमंत्री सुरेश धस यांना जाहिर होताच माजी आमदार व भाजपा नेते भीमराव धोंडे यांनी कडा येथे सोमवार (दि.२८) रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आ.सुरेश धस यांनी माझ्यासोबत राहून विरोधात काम केले.त्यामुळे मला पराभवाला सामोरे जावे लागले.आता मी त्यांच्या सोबत राहुन त्यांचे काम कसे करु त्यावेळी महाराष्ट्रात पराभूत उमेदवारांमध्ये एक लाखाहून अधिक मते मिळालेली भाजपाचे फक्त तीन उमेदवार होते.पक्षश्रेष्ठींनी मला त्याचवेळी सांगितल्याप्रमाणे मी पाच वर्षे लोकांच्या संपर्कात राहून काम केले.परंतु मला उमेदवारी दिली नाही.पाच वर्षे लोकांच्या संपर्कात आहे.चार महिन्यापासून मतदार संघात फिरत आहे.मतदारसंघातील वाडी वस्ती पिंजून काढली आहे.मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकाग्रहास्तव मी अपक्ष निवडणुकीत उतरलो असुन आता माघार घेणार नाही.२०१४ ते २०१९ या काळात मी मतदारसंघातील रस्ते विकासाबरोबरच इतरही प्रचंड विकास कामे केलेली आहेत.या निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला.