धनंजय मुंडेंवर तोंड लपवण्याची वेळ-आमदार सुरेश धस
मुंबई click2ashti-बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराड यांचे नाव आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेत. ते गत 2 दिवसांपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ते कुठे गेलेत?असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर तोंड न दाखवण्याची वेळ आल्याचा आरोप करत ते कुठे तरी लपून बसल्याचा संशय व्यक्त केला आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निघृण हत्या झाली.या प्रकरणातील आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः या प्रकरणी मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचे नाव आल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडलेत. विरोधकांनी या प्रकरणी टीकेची झोड उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यासंबंधी विधानसभेत विस्तृत निवेदन केले. त्यात त्यांनी बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी मोडून काढण्याचा निर्धार केला. तसेच या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईही करण्याचीही ग्वाही दिली. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे गायब झाल्याची चर्चा रंगली आहे.
धनंजय मुंडेंवर तोंड लपवण्याची वेळ
मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधला.त्यात त्यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा कडाडून हल्ला चढवला.ते म्हणाले,संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे जे आका आहेत,ते धनंजय मुंडे यांचे शागिर्द आहेत. धनंजय मुंडे यांच्या शागिर्दावर (वाल्मिक कराड) एवढे आरोप होत असताना ते कुठे लपून बसले आहेत ते माहिती नाही. मुंडे यांनी समाजापुढे येऊन आपली बाजू स्पष्ट केली पाहिजे.त्यांच्यावर तोंड न दाखवण्याची वेळ आली असली तरी त्यांनी समाजापुढे यायला हवे.
वाल्मिक कराडचे नाव फक्त खंडणीपर्यंत मर्यादित आहे. मात्र पवनचक्की कंपनीला वाल्मिक कराडने खंडणी मागायला लावली असेल,तसेच नंतर फोन करून संतोष देशमुख यांचा खून झाला असेल,तर 101 टक्के वाल्मिक कराड मकोका आणि 302 मधील आरोपी होतील,असा दावाही सुरेश धस यांनी यावेळी केला.