प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई I प्रतिनिधी
नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, सांडपाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्व समावेशक आराखडा बनवणार असून. नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्य क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण नियंत्रणासाठी, प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
आय. आय. टी., पवई येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आय. आय. टी., पवई यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक स्वराज्य संस्थां प्रामुख्याने नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात सांड पाण्याचे व्यवस्थापन व शाश्वत उपाययोजना (मुन्सिपल वेस्ट वॉटर मॅनेजमेंट गॅप्स, सस्टेनबिलिटी अँड वे फॉरवर्ड) या विषयावर एक दिवसाची परिषद आयोजित करण्यात आली होती, या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी नगर विकास (२) विभागाचे प्रधान सचिव के.एच. गोविंदराज,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, आय. आय. टी., पवई च्या पर्यावरण विभाग व इंजिनिअरिंगचे प्रोफेसर मुनेश कुमार चंदेल, प्रोफेसर अनिल कुमार दीक्षित, राज्यातील महानगरपालिका,नगरपालिका या क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण अधिकारी तथा तंत्रज्ञ या कार्य शाळेला उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामपंचायती,नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या त्या स्थानिक भागातील प्रदूषित पाणी या नद्यांमध्ये थेट मिसळले जाते. प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषित पाणी थेट पाण्याच्या प्रवाहामध्ये मिसळू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नद्या व तलावांचे संवर्धनही भविष्याची गरज ओळखून त्याचा सुनियोजित तांत्रिक आराखडा पर्यावरण विभागाकडून बनवला जाणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये लोकांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान माहिती होण्यासाठी पर्यावरण विभाग एक तांत्रिक कक्ष देखील स्थापन करून करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरून प्रदूषणाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवता येतील असेही मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.