देशमुख, मुंडे हत्या प्रकरण आणि बीड पाेलिसाच्या तक्रारीसंदर्भात आ.धस यांनी घेतली महासंचालकांची भेट
मुंबई । प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरण, अवैध राख प्रकरण आणि अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात बेकायदेशीर होत असलेल्या आर्थिक व्यवहार आदी प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आज पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले.
आ.धस म्हणाले की, काही निवडक पोलिस अधिकारी अनेक वर्षे बीडमध्ये कार्यरत आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार होत असून गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. पोलिस अधिकारी गणेश मुंडेची एसीबी चौकशी सुरू असतानाही त्याला क्रीम पोस्टवर कोणी आणले याची चौकशी करण्यात यावी. बीडमध्ये एकाच ठिकाणी काही पोलिस हे 15-20 वर्षे कसे कार्यरत आहेत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरेश धसांनी रश्मी शुक्ला यांच्याकडे केली. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी करा, बीडमधील राखेची अवैध वाहतूक आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करा, मुंबईतील पोलिसांच्या विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.