तालुक्यातील दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्याच्या कामांना आपण सात दिवसात प्रशासकीय मान्यता मिळवली-आ.सुरेश धस
क्लिक2आष्टी अपडेट-भारतीय जनता पार्टी,शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ सात दिवसाच्या आत आष्टी तालुक्यातील दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्याच्या कामांना आपण प्रशासकीय मान्यता मिळवली असून त्यामध्ये धानोरा ते खरडगव्हाण आणि मराठवाडी-केळ-दौलावडगाव या दोन महत्त्वाच्या रस्ता कामांना आज सुरुवात होत आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
आष्टी तालुक्यातील धानोरा ते खरडगव्हाण या ८ किलोमीटर अंतराच्या आणि ५ कोटी रुपये किमतीच्या कामाचा आणि मराठवाडी- केळ-दौलावडगाव या ३.५ किलोमीटर अंतराच्या ३ कोटी रुपये किमतीच्या या दोन रस्ते कामांचा शुभारंभ आमदार सुरेश धस यांच्या हस्ते धानोरा व पिंपळगाव घाट येथे करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी आ.साहेबराव दरेकर,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,सभापती बद्रीनाथ जगताप,माजी सभापती अंकुश चव्हाण,गोपाळराव रक्ताटे,दत्तोबा वाडेकर,राजेंद्र दहातोंडे, उपअभियंता शिवाजी सानप आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,दि.३० जून २०२२ रोजी महाविकास आघाडी गेली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सरकार स्थापन झाले विकासाचा ध्यास घेतलेले हे सरकार असल्याने आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्याचे सांगितले.त्यातील १० टक्के रक्कम असलेले ५ कोटी रुपये किमतीचे हे रस्ता काम आपण प्राधान्याने मंजूर करून घेतले.धानोरा ते खरडगव्हाण या रस्ता कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली त्यापुढील खरडगव्हाण ते लोणी या रस्त्या कामाला विद्यमान आमदारांनी मंजुरी मिळवली आहे.परंतु अद्यापही या कामाला सुरुवात केलेली नाही.या भागातील अत्यंत महत्त्वाचा असलेला बोरोडी या गावाजवळील पुलाचे बांधकाम जिल्हा विकास निधीतून ३० लक्ष रुपये किमतीच्या या पुलाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून शंभर मीटर अंतराचा असलेला हा पूल या परिसरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खुंटेफळ पासून वाहिरा पर्यंतचा ६ किलोमीटर रस्ता जिल्हा विकास निधी मधून होणार असून त्याची निविदा प्रक्रिया चालू आहे. तसेच वाघळूज ते अंभोरा हा रस्ता देखील लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सन २०११ मध्ये लोणी ते नगर सरहद्द या कामाचे टेंडर झालेले आहे. परंतु ते आता रद्द करून रिटेंडर करून या रस्त्या कामाची सुरुवात होणार आहे.साबलखेड ते पिंपरखेड या रस्ता कामासाठी देखील प्रयत्न सुरू असून काकडवाडी ते ठोंबळसांगवी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ४.५ कोटी रुपये किमतीचा असून या परिसरातील रस्ते रेल्वेच्या कामामुळे आणि माती आणि वाळू वाहतूक करणाऱ्या जडवाहनांमुळे अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे या रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे.तसेच नांदुर ते घोंगडेवाडी,सुंबेवाडी हा देखील रस्ता आपण करणार आहोत असे सांगितले.खुंटेफळ-वाटेफळ-कोयाळ हा रस्ता देखील गंभीर अवस्थेत आहे. पुरवणी बजेटमध्ये या काम करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच साकत येथील पुलाचे काम देखील अत्यावश्यक असल्याने त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले.लोणी ते धानोरा ते वृद्धेश्वर हा रस्ता “हॅम” योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आला असून इतर जिल्ह्यातील दोन तालुक्याशी संबंधित असलेले दोन रस्ते दर्जेदार ७.५० मीटर्स रुंदीचे होणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे नागरिकांचे दळणवळण अत्यंत सुकर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी या कामाविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून घेऊन या सर्व रस्ता कामांचा दर्जा राखून काम करावे अशी विनंती सुरुवातीस करणार असून त्यानंतर गरज पडली तर अधिकारवाणीने देखील मी सांगणार आहे.खुंटेफळ साठवण तलावाच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की,आष्टी तालुक्याच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा खुंटेफळ साठवण तलाव असून यासाठी ५८ कोटी रुपये भूसंपादनासाठी प्राप्त झालेले असून १६ ते १८ कोटी रुपये एडव्हान्स मिळालेले आहेत.आष्टी तालुक्याच्या वाट्याचे असलेले ५.६८ टीएमसी पाणी मिळणार आहेच.तोपर्यंत १.६८ टीएमसी पाणी मिळावे यासाठी लागणारा निधी उपलब्ध लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकल्प ग्रस्तांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे त्या लोकांनी तात्काळ आपापल्या सोयीनुसार पुनर्वसित जागी जाण्यासाठी पुनर्वसनाची रक्कम स्वीकारावी असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.तसेच आष्टी तालुक्यातील ग्रीन फिल्ड कॉरिडॉर असलेल्या चेन्नई महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीबाबत देखील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी शेवटी यावेळी सांगितले.यावेळी बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की,या भागातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील लोकांच्या व्यथा मला चांगल्या माहित आहेत. ठेकेदार आणि अधिकारी यांनी दर्जेदार काम करून घेण्यासाठी आपला आग्रह राहील असे सांगून कसेही काम करा असे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच सावरगाव ते शेंडगेवाडी हा रस्ता व्हावा आणि सोलापूरवाडी येथे पूल किंवा काँक्रीटचा रस्ता व्हावा आणि या रस्त्याच्या बाजूने नाली बांधकाम व्हावे अशी मागणी त्यांनी केली.यावेळी धानोरा,खुंटेफळ, सोलापुरवाडी,पिंपळा,खरडगव्हाण,मराठवाडी,पिंपळगाव घाट,केळ, दौलवडगाव या गावचे सरपंच,ग्रा.प.सदस्य,प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.