मराठा सेवा संघाचा ठराव;प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी..अनाठायी खर्च गरिबांच्या लग्नात करा
सोलापूर मराठा सेवा संघाचा ठराव
क्लिक2आष्टी अपडेट-मराठा समाजातील नियोजित वधू- वरांनी प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव रविवारी सोलापुरात मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित वधू-वर मेळाव्यात घेण्यात आला. सुसंस्कृत, कर्तृत्ववान व संस्कारी मुला-मुलींची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करा, कशाचीही अपेक्षा न करता, साध्या पद्धतीने विवाह सोहळा करा,असा सल्लाही मान्यवरांनी दिला.
या ठरावाला सर्व समाजबांधवांनी एकमताने मान्यता दिली. त्याचे निवेदन जिजाऊ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा प्रशासन व शासनाला देण्याचेही ठरले.
या मेळाव्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातून सुमारे ५०० वधू-वर आणि पालक उपस्थित होते. इच्छुक वधू-वरांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर अशा उच्चशिक्षितांचा समावेश होता. यापूर्वी एप्रिल महिन्यात नंदुरबार येथे गुरव समाजाच्या मेळाव्यातही प्री-वेडिंग फोटोशूटला बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. असे फोटो लग्न समारंभात मोठ्या डिजिटल पडद्यावर प्रदर्शित करणे चुकीचे आहे, असा ठरावही सर्वानुमते घेतला होता.
प्री-वेडिंग शूटिंगचा खर्च गरिबांच्या लग्नावर करा
परिस्थिती नसतानादेखील कर्ज काढून प्री-वेडिंग शूटिंगवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. त्याने वैयक्तिक खासगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथाही रुढ झाली. त्याला कुठे तरी आळा बसलाच पाहिजे. प्री-वेडिंग शूटिंगवर येणारा खर्च गोरगरिबांच्या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत म्हणून देण्याचा विचार व्हावा. भविष्यात ‘एक गाव, एक विवाह’ ही संकल्पना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुढे आणली जाणार आहे.
–प्रशांत पाटील,जिल्हाध्यक्ष मराठासेवा संघ सोलापूर